fintechservice

एक देश एक आयकर प्रणालीकडे वाटचाल भाग दोन

लेख – 13 दिनांक – 12.08.2024

सीए जयंती कुळकर्णी

सनदी लेखापाल, कुडाळ

ईमेल – fintechservices21@yahoo.com

वेगवेगळ्या करकपातीमधील कलमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच काही बाबींवरील करकपात कमी करण्यासाठी बरेच बदल करण्यात आले आहेत. या सर्व तरतुदींतील बरेचसे बदल दि. १ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू होतील.
१) कलम १९२ पगारातील उत्पन्नावर करकपात
कलम १९२(२A) आणि (१C) या कलमांमध्ये बदल करून सुसूत्रता आणण्यात आली आहे. पगारदार व्यक्तींच्या उत्पन्नातून इतर कोणत्याही कलमाखाली मुळातून करकपात केली असेल (TDS) किंवा वस्तू खरेदीतून कर कपात केली असेल (TCS) तर ती कर कपात विचारात घेऊन  मालकाने पगारातून करकपात करावी. उदा. गाडी घेताना त्यामधून TCS झालेला असेल तर तेवढी रक्कम कमी करून पगारातून करकपात करायला हवी. त्यामुळे पगारधारांना कोणत्याही टीडीएस/टीसीएसचा फायदा मिळून पगारातली करकपात योग्य प्रमाणात होईल.

२) कलम १९३ – शासकीय सिक्युरिटी/बाँड्सवरील मिळणारी व्याजाची रक्कम  जर रु. २,५००/- पेक्षा जास्त असेल तर त्या व्याजातून १०%  करकपात केली जाईल.

३) कलम १९४ – लाभांश
शेअर्सवरील किंवा म्युच्युअल फंड वरील लाभांशाची रक्कम रु. ५०००/- पेक्षा जास्त असेल तर त्यातून १०% करकपात केली जाईल.

४) कलम १९४ ए – व्याज (शासकीय सिक्युरिटीज किंवा बॉन्ड वरील सोडून)
बँका पोस्ट ऑफिस किंवा सहकारी सोसायटी यांच्याकडून मिळणाऱ्या ठेवींवरील व्याजावर रु.४००००/- पेक्षा जास्त असेल (ज्येष्ठ नागरिकांना ही मर्यादा रु.५००००/-) तर त्यातून १०% दराने करकपात केली जाईल.

५) कलम १९४बी – लॉटरी किंवा कोड्यामध्ये जिंकलेल्या बक्षीसाची रक्कम रु. १००००/- पेक्षा जास्त असेल तर ३०% दराने कर कपात केली जाईल.
६) कलम १९४बीए – ऑनलाइन गेम मधील बक्षिसे – ऑनलाइन गेममध्ये जिंकलेल्या बक्षिसाच्या संपूर्ण रकमेमधून 30% दराने कर कपात करण्यात येईल.

७) कलम १९४सी कंत्राटदाराला पेमेंट करताना
सेवा पुरवठादाराला त्याच्या कामाची रक्कम देताना १९४सी या कलमाखाली करकपात न करता १९४जे या कलमानुसार करकपात करण्यात यावी अशी तरतूद केली आहे. एका कंत्राटाची रक्कम रू ३०,०००/- पेक्षा जास्त आणि एकत्रित रु. १,००,०००/- पेक्षा जास्त  असेल तेव्हा करकपात दर १% वैयक्तिक व्यक्ती/हिंदू अविभक्त कुटुंबाच्या बाबतीत आणि २% इतरांच्या बाबतीत राहील.

८) कलम १९४डी- इन्शुरन्स कमिशन
कोणत्याही भारतीय रहिवासी असलेल्या व्यक्तीला इन्शुरन्स कमिशन देताना करकपातीचा दर सध्या ५% आहे तो कमी करून २% पर्यंत कमी करण्याचे सुचविण्यात आले आहे आणि हा करकपातीचा दर ०१/०४/२०२५ पासून लागू होईल.

९) कलम १९४डीए- जीवनविमा मुदतपूर्तींची रक्कम
जीवनविमा मुदतपूर्तीची रक्कम विमेदाराला देताना आधी करकपातीचा दर ५% होता तो कमी करून २% केला आहे.आणि हा करकपातीचा दर ०१/१०/२०२४ पासून लागू होईल.

१०) कलम १९४जी – लॉटरी तिकीट विक्रीवरील कमिशन
कोणतीही व्यक्ती लॉटरी तिकीट विक्री, खरेदी साठा करत असेल आणि त्यापासून तिला कमिशनचे उत्पन्न रू १५,०००/- पेक्षा जास्त मिळत असेल तर ५% दराने करकपात केली जाते. हा दर २% पर्यंत कमी करण्यात आला आहे. आणि हा करकपातीचा दर ०१/१०/२०२४ पासून लागू होईल.

११) कलम १९४एच – कमिशन किंवा ब्रोकरेज
कोणतीही व्यक्ती (वैयक्तिक व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब वगळून) कोणत्याही भारतीय रहिवाशाला कमिशनच्या स्वरूपात रक्कम देत असेल (इन्शुरन्स कमिशन वगळता) किंवा ब्रोकरेज देत असेल तर त्यामधून ५% करकपात केली जाते तो दर आता २% करण्यात आला आहे. आणि हा करकपातीचा दर ०१/१०/२०२४ पासून लागू होईल.

१२) कलम १९४आयबी – भाड्याच्या रक्कमेतून करकपात
कोणतीही व्यक्ती (वैयक्तिक व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब) जर कोणत्याही भारतीय रहिवाशाला भाड्याच्या स्वरूपात रू ५०,०००/- पेक्षा जास्त रक्कम दर महिना देत असेल तर त्यातून ५% करकपात करणे आवश्यक आहे हा दर २% एवढा कमी करण्यात आला आहे. आणि हा करकपातीचा दर ०१/१०/२०२४ पासून लागू होईल.

१३) १९४ओ – ई कॉमर्स ऑपरेटर ने त्याच्या विक्रेत्याला रक्कम देताना –
डिजिटल व इलेक्ट्रॉनिक्स व्यापाराच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या व्यापारी त्याच्या मालाची विक्री ऑनलाइन करतो किंवा सेवा पुरवठादार ऑनलाइन सेवा पुरवितो तेव्हा त्या ई-कॉमर्स ऑपरेटरने (उदा. ॲमेझॉन इ.) त्याला रक्कम देताना त्याच्या ढोबळ विक्रीच्या रकमेवर / सेवेवर १% दराने करकपात करणे आवश्यक आहे. हा दर आता ०.१% एवढा कमी करण्यात आला आहे. आणि हा करकपातीचा दर ०१/१०/२०२४ पासून लागू होईल.

१४) कलम १९४टी -भागीदारी फर्म मधून भागीदारांना देण्यात येणारी रक्कम –
भागीदारी फर्ममध्ये भागीदारांना पगार, मानधन, भांडवलावरील व्याज, बोनस, कमिशन यापैकी कोणतीही रक्कम देताना त्यावर मुळातून करकपातीचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. ही करकपात १०% दराने करण्यात येईल आणि ही तरतूद ०१/०४/२०२५ पासून लागू होईल.

१५) कलम १९४आय ए – स्थावर मालमत्ता विक्री करताना –
कोणतीही स्थावर मालमत्ता विकताना रू ५० लाख पेक्षा जास्त किंमत असेल तर १% करकपात करणे आवश्यक आहे. विक्री किंमत किंवा मूल्यांकन किंमत यातील जास्त असेल त्यावर कर कपात केली जाईल. त्यातील नवीन बदल असा आहे की जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या व्यवहारामध्ये समाविष्ट असतील तेव्हा रू ५० लाख ही रक्कम व्यक्तीनुसार मोजण्यात यावी. या कलमामध्ये जी संदिग्धता होती ती स्पष्ट करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकच अचल मालमत्ता (घर, जमीन इ.) खरेदी किंवा विक्री केली असेल तर प्रती व्यक्ती ५० लाख पेक्षा जास्त रक्कम असेल तरच करकपात करण्यात यावी.

१६) कलम २०६सी (१एफ) महागाईच्या व आरामदायी वस्तू खरेदी –
मोटर कार विक्री करणाऱ्या व्यक्तीने रू १० लाख पेक्षा जास्त किंमतीच्या गाडीच्या रकमेवर १% दराने करकपात करावयाची आहे. यामध्ये नवीन बदलानुसार केंद्र सरकारने अधिसूचित केलेली कोणतीही वस्तू ज्याची किंमत रु १० लाख पेक्षा जास्त असेल अशा वस्तूंवरही ही करकपात लागू होईल.
म्हणजे एकंदरीत करविस्ताराचे जाळे व्यापक करण्यासाठी करकपातींच्या कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत तसेच काही नवीन कलमे घालण्यात आली आहेत. करदात्यापेक्षा जास्त माहिती आयकर विभागाकडे वेगवेगळ्या माध्यमांमधून जमा होत असते त्यामुळे करदात्याने आपले सर्व उत्पन्नाचे स्त्रोत व खर्चाचे तपशील तपासून आपले आयकर विवरण पत्र भरणे सावध पणाचे राहील.
पुढच्या भागात आपण भांडवली नफ्यामधील बदल तपशीलवार पाहू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top