fintechservice

सन 2023-24 करिता नवीन आयकर प्रणाली (New Tax Regime)

लेख पहिला

सीए. जयंती कुळकर्णी

सनदी लेखापाल, कुडाळ.

ईमेल – fintechservices21@yahoo.com

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने कमी कराचा दर असणारी वैकल्पिक कररचना (New Tax Regime) सादर केली आहे. सन 2023-24 करीता या करप्रणालीमधील कराच्या दरामध्ये बरीच घट करण्यात आली असून ही करप्रणाली आता आपसूक लागू होईल (Default Scheme).  पारंपरिक कराचे दर असणारी पूर्वीची करप्रणालीसुद्धा प्रचलित राहणार असून करदात्याला ती देखील स्विकारता येईल.

आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर विवरणपत्रक (Income Tax Return) ऑनलाइन भरण्यासाठीची सुविधा दि. 01 एप्रिल 2024 पासून उपलब्ध करून दिली आहे. आपण या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण पत्रक भरताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे विवेचन या लेखात करूया.

बऱ्याच लोकांना कोणत्या करप्रणाली नुसार आयकर विवरणपत्रक (Income Tax Return) भरावे याबाबत संभ्रम आहे. मात्र जी करप्रणाली आपल्याला फायदेशीर असेल त्या करप्रणालीप्रमाणे आयकर विवरणपत्र भरता येईल अशी सुविधा दिली आहे. यावर्षी सरकारने “नवीन करकरप्रणाली” हीच मूलभूत करप्रणाली (Default Scheme) स्वीकारावी असा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नवीन करप्रणाली ही वैकल्पिक असल्याने करदात्याने कोणत्या करप्रणालीत कमी करदेयता येईल त्याप्रमाणे करप्रणालीची निवड करता येईल. 

नवीन व जुनी करकरप्रणाली यामधील मूलभूत फरक हा यामध्ये असलेल्या गुंतवणुकीमुळे मिळणा-या सूट व सवलती आणि वजावटी यांमुळे आहे. जुन्या करकरप्रणाली नुसार व्यक्ती (Individual) व अविभक्त हिंदू कुटुंब (HUF) तसेच असोसिएशन ऑफ पर्सन (AOP) आणि बॉडी ऑफ इंडिविजूयल (BOI) यांच्या उत्पन्नातून वेगवेगळ्या सवलत पात्र वजावटीचा फायदा घेऊ शकते. जसे की, विमा हप्ता, गृहकर्जाचा हप्ता, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील मधील गुंतवणूक, शाळेची ट्यूशन फी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक, करसवलत पात्र म्यूचुअल फंडामधील गुंतवणूक इत्यादी (80C) तसेच एनपीएस मधील गुंतवणूक, वैद्यकीय उपचारासाठीचा विमा व खर्च, बचत / बँक खात्यामधील ठेवीवरील व्याज, विविध देणग्या इत्यादी.

नवीन करप्रणाली नुसार व्यक्तिच्या उत्पन्नानुसार कमी दराने करभरणा करावा लागेल. मात्र या करप्रणाली नुसार गुंतवणुकीची कोणतीही वजावट आणि सवलत मिळणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच पगारदार व्यक्तीना मिळणारी रुपये 50,000/- ची प्रमाणित वजावट (standard deduction) मात्र दोन्ही करप्रणालीमध्ये उपलब्ध असणार आहे.

नवीन करप्रणालीनुसार कर आकारणी दर

एकूण उत्पन्न                  कराचा दर
रु. 300000/-0% कर
रु. 300001/- ते 600000/-5% कर
रु. 600001/- ते 900000/-10% कर
रु. 900001/- ते 1200000/-15% कर
रु. 1200001/- ते 1500000/-20% कर
रु. 1500000/- पेक्षा जास्त30 % कर

जुन्या करप्रणालीनुसार कर आकारणी दर

उत्पन्न                 कराचा दर
रु. 250000/-0% कर
रु. 250001/- ते 500000/-5% कर
रु. 500001/- ते 1000000/-20% कर
रु. 1000000/- पेक्षा जास्त30% कर

फक्त वेतन, व्याज, घरभाडे इत्यादी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीना त्यांचे आयकर विवरणपत्र  भरताना आपला करप्रणालीबाबतचा पर्याय स्विकारता येईल.  धंदा अथवा व्यवसायाचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला मात्र जुनी करप्रणाली स्वीकारायची असल्यास मुदतीच्या आधी वेगळा अर्ज सादर करावा लागेल.

कोणताही पर्याय न स्वीकारल्यास नवी करप्रणाली आपोआपच लागू होईल.

वरील तरतुदींचा विचार करता करदात्याने आपले उत्पन्न निश्चित करून आपल्याला फायदेशीर अशी करप्रणाली स्वीकारावी. त्यासाठी आपल्या करसल्लागाराशी चर्चा करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top