लेख – 11 दि. 14 जुलै, 2024
सीए जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ
ईमेल – fintechservices21@yahoo.com
आता परिशिष्ट १ प्रमाणे कोणत्या व्यक्तींची व्यवसाय कर देयता किती आहे ते ढोबळमानाने पाहू.
अ. मासिक वेतनावर काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी व्यवसाय कराची कपात खालील प्रमाणे असेल –
१. पगार/वेतन रु. ७५०० पेक्षा कमी – व्यवसायकर शून्य
२. पगार/वेतन रु. ७५०० पेक्षा जास्त पण रु. १०००० पेक्षा कमी – रु. १७५ दरमहा राहिल.
३. पगार/वेतन रु.१०००० पेक्षा जास्त – रु. २५०० वार्षिक राहिल.
ब. मासिक वेतनावर काम करणाऱ्या स्त्री कर्मचाऱ्यांसाठी व्यवसाय कराची कपात खालील प्रमाणे असेल –
१. पगार/वेतन रु. २५००० पेक्षा कमी – व्यवसायकर शून्य
२. पगार/वेतन रु.२५००० पेक्षा जास्त – रु. २५०० वार्षिक राहिल.
पगारातून कपात केलेल्या व्यवसाय कराचे विवरणपत्र ऑनलाइन भरावे लागते. नोंदणी घेतल्यानंतर पहिल्या वर्षी मासिक विवरणपत्र भरावे लागते व त्यानंतर करदेयतेनुसार मासिक किंवा वार्षिक विवरणपत्र भरावे लागते.
२. कायदेविषयक व्यवसाय करणारे वकील, नोटरी इत्यादी
३. वैद्यकीय व्यावसायिक – सल्लागार, दंतवैद्य इत्यादी
४. तांत्रिक आणि धंदेविषयक सल्लागार, आर्किटेक्ट, इंजिनिअर, कर सल्लागार, आर. सी. सी. सल्लागार, सी. ए., अँक्चुअरीज, मँनेजमेंट सल्लागार इत्यादी.
५. विविध प्रकारचे एजंट, सर्व्हेअर, नुकसान गणना करणारे इत्यादी
६. कमिशन एजंट, दलाल आणि ब्रोकर इ.
७. सर्व प्रकारचे कंत्राटदार, इस्टेट एजंट, दलाल, प्लंबर इत्यादी
८. हिऱ्यांना पैलू पाडणारे आणि पॉलिश करणारे
९. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या कंपन्यांचे संचालक
१०. व्हिडीओ किंवा आँडिओ पार्लर किंवा लायब्ररी चालवणारे व्यक्ती
११. केबल आँपरेटर्स, फिल्म डिस्ट्रिब्यूटर्स
१२. लग्न सभागृह चालवणारे किंवा मालक, कॉन्फरन्स हॉल, हेल्थ सेंटर, पूल पार्लर वगैरे
१३. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस घेणारी किंवा चालविणारी व्यक्ती
१४. पेट्रोल/डिझेल/ऑईल पंप आणि सर्व्हिस स्टेशन, गॅरेज आणि ऑटोमोबाईल्सचे / वर्कशॉपचे मालक / चालक
१५. परवानाधारक परदेशी दारूचे विक्रेते निवासी हॉटेलांचे व सिनेमागृहाचे मालक
१६. बँकिंग व्यवहार करणा-या संस्था
१७. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपन्या
१८. नोंदणीकृत अथवा अनोंदित भागीदारी – जी कोणत्याही धंद्यात, व्यापारात किंवा आजिवीकेमध्ये गुंतलेला कोणताही भागीदार
यामध्ये LLP – लिमिटेड लायबीलिटी पार्टनरशीपचाही समावेश होतो.
१९. कोणत्याही प्रकारचे सेवा पुरवठादार
२०. जीएसटी खाली नोंदणीकृत कोणतीही व्यक्ती
२१. कोणत्याही धंद्यात, व्यापारात किंवा आजिवीका अथवा आस्थापना यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती
२२. सहकार कायद्याखालील नोंदणी असलेल्या किंवा नोंदणीपात्र सर्व संस्था ज्या व्यवसाय, धंदा अथवा आजीविका करीत आहेत.
२३. हिंदू अविभक्त कुटुंब जे कोणत्याही व्यवसायात, धंद्यात अथवा आजीविकेमध्ये गुंतलेले आहे.
२४. मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचे सदस्य,
२५. परवानाधारक सावकार,
२६. चिटफंड चालवणारी व्यक्ती किंवा संस्था
वरील अनु. क्र. २ ते २६ साठी –
व्यवसायकर – रु. २५०० वार्षिक राहिल.
आता या कायद्याखालील व्याज आणि दंड यांची ढोबळमानाने माहिती घेऊ.
व्याज : १. करभरणा करण्याच्या विहित तारखेपासून १ महिन्याचा उशीर असेल तर –
संबंधित महिन्याच्या किंवा त्याच्या भागासाठी न भरलेल्या करावर १.२५ % महिना दराने व्याज लागेल.
२. करभरणा करण्याच्या विहित तारखेपासून ३ महिन्याचा उशीर असेल तर –
एक महिन्याच्या उशीरासाठी वरील १. प्रमाणे व एक महिन्यापासून तीन महिन्यापर्यंतच्या उशीरासाठी प्रत्येक महिन्याच्या किंवा त्याच्या भागासाठी न भरलेल्या करावर १.५० % महिना दराने व्याज लागेल.
३. करभरणा करण्याच्या विहित तारखेपासून ३ महिन्यांपेक्षा जास्त उशीर असेल तर –
एक महिन्याच्या उशीरासाठी वरील १. प्रमाणे, एक ते तीन महिन्यापर्यंतच्या उशीरासाठी वरील २. प्रमाणे आणि तीन महिन्यांपेक्षा जास्तीच्या प्रत्येक महिन्याच्या किंवा त्याच्या भागासाठी न भरलेल्या करावर २.०० % महिना दराने व्याज लागेल.
विलंब शुल्क अर्थात दंड –
१. विवरणपत्र दाखल करण्याचा विहित कालावधी संपल्यानंतर ३० दिवसाच्याज् आत विवरणपत्र दाखल केल्यास विलंब शुल्क रु. २००/- आणि इतर बाबतीत रु. १,०००/- भरावे लागते. हे विलंब शुल्क भरल्याशिवाय उशीर झालेले विवरणपत्र दाखल करता येत नाही.
२. नोंदणी उशीराने घेतल्यास विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी रु. ५/- ते रु. २०/- इतका दंड लागू शकतो.
३. नोंदणी अर्जात खोटी माहिती दिल्यास – त्या बाबतीत येणा-या कराच्या तीनपट एवढा दंड होऊ शकेल.
४. योग्य कारणाशिवाय विहित मुदतीत करभरणा न केल्यास देय कराच्या १०% एवढा दंड होऊ शकतो.
५. या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे हिशोबपुस्तके व कागदपत्रे न ठेवल्यास तशी सूचना मिळाल्यापासून उशीराच्या प्रत्येक दिवसाला रु. ५/- एवढा दंड होऊ शकतो.
६. या कायद्यातील कोणतेही कलम अथवा नियम यांचा भंग केल्यास, आणि त्याबद्दल दोषी ठरल्यास जास्तीत जास्त रु. ५,०००/- एवढा दंड होऊ शकतो. आणि तरीही उल्लंघन चालू राहिल्यास अशा मुदतीत प्रतिदिन रु. ५०/- एवढा दंड होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.