लेख – सहावा
सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ
ईमेल – fintechservices21@yahoo.com
दि. २६ मे, २०२४
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) ही भारतातील सरकारी पुरस्कृत निवृत्तीवेतन योजना आहे. भारतीय नागरिक या योजनेमध्ये 65 वर्षांपर्यंत सहजपणे गुंतवणूक करू शकतात. सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या चांगल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात.
ही योजना निवृत्ती पश्चातचे आर्थिक नियोजन आणि करलाभ अशा दोन्ही दृष्टिकोनातून फायद्याची आहे.
ज्यांना आपल्या निवृत्तीची योजना लवकर आखायची आहे आणि कमीत कमी जोखीम घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही एनपीएस योजना अतिशय उत्तम आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती पश्चात नियमित पेन्शन हे वरदान ठरेल.
या पेन्शन योजनेमध्ये वार्षिक 9% ते 12% व्याजदर आहे. या योजनेसाठी किमान गुंतवणूकीची रक्कम ₹ 500 आहे. त्यामुळे, गुंतवणूक सुरू करण्यासाठी सहज शक्य आहे.
एनपीएसची वैशिष्ट्ये आणि फायदे
1. ही योजना PFRDA द्वारे नियंत्रित केले जाते आणि कोणत्याही नागरिकास स्वेच्छेने सदस्यत्व घेता येते
2. ही जगातील सर्वात कमी किमतीची पेन्शन योजना आहे
3. सदस्याने नोकरी किंवा शहर बदलले, तरी त्याच ‘एनपीएस’ खात्याचा वापर करता येतो.
4. आयकर कायद्या अंतर्गत सदस्यांना कर सवलत उपलब्ध आहे.
5. ग्राहकांनी केलेल्या गुंतवणुकीवर निवडीवर आधारित शेअर बाजाराशी निगडीत परतावा मिळतो.
6. सदस्य त्यांच्या एनपीएस खात्यांमध्ये ऑनलाईन प्रवेश करू शकतात.
7. सदस्याला त्याचे गुंतवणूक पर्याय; तसेच विशिष्ट पेन्शन फंड निवडण्याची आणि त्यात वेळोवेळी बदल करण्याची मुभा आहे.
8. आपण केलेल्या गुंतवणुकीच्या काही वेळेला आंशिक रक्कम काढून घेता येते. मात्र त्यासाठी काही अटी आहेत.
एनपीएस योजनेसाठी पात्रता –
18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय( NRI) आणि परदेशीय भारतीयांसह एनपीएसचे सदस्यत्व घेण्यासाठी पात्र आहे.
मात्र भारतीय वंशाच्या व्यक्ती (POI) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) एनपीएस चे सदस्य होण्यासाठी पात्र नाही.
आंशिक पैसे काढण्यासाठी अटी
1. एनपीएस सदस्य झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षे पूर्ण झाल्यास आंशिक पैसे काढता येतात. 2. सदस्यात्वाच्या कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढता येतात.
3. दिलेल्या योगदानापैकी 25% पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही.
करसवलत –
‘एनपीएस’ खात्यामध्ये केलेले योगदान हे प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रूपये, ८० सीसीडी (१ब) अंतर्गत ०.५० लाख रुपयांपर्यंत वजावटीसाठी पात्र असते; तसेच आपला नियोक्ताही योगदान देत असेल, तर पगाराच्या १० ते १४ टक्के अतिरिक्त करसवलत मिळू शकते. या तिन्ही सवलतींचा फायदा घ्यायचा असेल, तर मात्र जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडावा लागेल. नवीन करप्रणालीत एनपीएस खात्यामधील योगदानासाठी कलम ८०सीसीडी(२) अंतर्गत रु. ०.५० लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते.
ही योजना कलम ‘ईईई’ अंतर्गत करसवलतीस पात्र असली, तरी पेन्शन सुरू झाल्यावर दरमहा मिळणारी पेन्शन करपात्र असते.
दोन प्रकारची खाती –
‘एनपीएस’ अंतर्गत दोन प्रकारची खाती असतात. टिअर १ खाते हे सदस्याचे निवृत्ती खाते असते. त्यात नियमित गुंतवणूक करावी लागते; पण त्यातून निवृत्तीच्या वेळीच पैसे काढता येतात. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यातून अंशत: पैसे काढता येतात.
टिअर २ खाते उघडणे ऐच्छिक असते; तसेच या खात्याच्या वापरात लवचिकता असते.
निवृत्तीच्या वेळी एकूण रकमेच्या कमाल ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येते, तर उर्वरित ४० टक्के रकमेमधून नियमित पेन्शनसाठी ‘अॅन्युइटी’ प्लॅन घ्यावा लागतो. तुम्हाला ही रक्कम दर महिना, 3 महिने, 6 महिने किंवा वार्षिक आधारावर मिळते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती निवृत्तीनंतरही चांगली राहते.
निवृत्तीच्या वेळी उपलब्ध एकूण निधी पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते.
एनपीएस ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे मार्केटशी संबंधित जोखीमही त्यात असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की लक्षात ठेवा. आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका.