fintechservice

युनिफाईड पेन्शन स्कीम

लेख – 15    दि. 15 सप्टेंबर, 2024

सीए जयंती कुळकर्णी

सनदी लेखापाल, कुडाळ

ईमेल – fintechservices21@yahoo.com


सरकारने जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांचे मिश्रण करून नवीन युनिफाईड पेन्शन योजना नुकतीच सादर केली आहे. ही नवीन योजना एप्रिल 2025 पासून अंमलांत येईल.
या योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या मागील बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% एवढी खात्रीशीर पेन्शन दिली जाणार आहे. आणि त्यामध्ये महागाईच्या दराप्रमाणे वाढ केली जाईल. यामध्ये कर्मचाऱ्यांचा हिस्सा हा पगाराच्या 10% तर सरकारचा हिस्सा 18.5% एवढा असेल. खात्रीशीर किमान पेन्शन रु 10000/- आणि फॅमिली पेन्शनचे फायदे समाविष्ट असतील. या पेन्शन योजनेमध्ये खात्रीशीर पेन्शन मिळण्याची सरकारची हमी आहे.

जुनी पेन्शन योजना काय आहे?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली सेवा किमान दहा वर्षे पूर्ण केली आहे त्यांना शेवटच्या पगाराच्या प्रमाणात पेन्शन मिळते. तसेच निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्याचे पुनरावलोकन करून त्याप्रमाणे पेन्शन मिळते. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नसे. पेन्शनची पूर्ण जबाबदारी सरकारवर होती. एक जानेवारी 2004 आणि त्यापूर्वी जर सरकारी कर्मचारी नोकरीत समाविष्ट असेल त्यांना या योजनेचा फायदा घेता येत होता. ही योजना 2004 पासून बंद केलेली आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय आहे ?

1 जानेवारी 2004 नंतर जे सरकारी कर्मचारी नोकरीत समाविष्ट झाले त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू झाली. नंतर सरकारने ही योजना स्वयंरोजगारीत लोकांनाही तसेच असंघटित कर्मचाऱ्यांनाही 2009 पासून लागू केली. यामध्ये दर महिन्याला सभासदाने त्याच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत कर्मचारी हिस्सा भरावा आणि त्यानंतर पेन्शनचा लाभ घ्यावा अशी सुविधा आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सभासदांना पण वर्गणी/हिस्सा लागू झाला.
सरकारी कर्मचाऱ्यांचा हिस्सा पगाराच्या 10% आणि सरकारचा हिस्सा 14% अशा प्रमाणात रक्कम पेन्शन मध्ये जमा करण्यात येते. इतर सामान्य लोकांसाठी महिन्याला किमान पाचशे रुपये रक्कम ठरवण्यात आली आहे. निवृत्तीच्या नंतर एकूण जमा पेन्शनच्या 60% रक्कम काढून घेण्याची मुभा आहे. आणि ही रक्कम करमुक्त आहे. तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनेतील गुंतवणुकीला आयकर कायद्याखाली 80 सीसीडी या कलमानुसार रु. 150000/- एवढी सवलत गुंतवणुकीनुसार मिळू शकते.

युनिफाईड पेन्शन योजना काय आहे?

मार्च 2023 मध्ये जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या योजनांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली गेली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे युनिफाईड पेन्शन योजना एप्रिल 2025 पासून लागू करण्यात येईल. त्याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे –
1. खात्रीशीर पेन्शन – यामध्ये मागील बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येईल. त्यासाठी नोकरीतील सेवा 25 वर्षे होण्याची आवश्यकता आहे. 10 ते 25 वर्षे या कालावधीत निवृत्ती घेतल्यास पेन्शन त्या प्रमाणात कमी होईल. परंतु किमान 10000 रुपये एवढी पेन्शन मिळण्याची हमी सरकार द्वारा दिली आहे.
2. फॅमिली पेन्शन – एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या पेन्शनच्या 60% एवढी खात्रीशीर पेन्शन मिळत राहील.
3. महागाईच्या दर विचारात घेऊन त्याप्रमाणे पेन्शनची रक्कम ठरवली जाईल.
4. एकदम मिळणारी रक्कम मिळत असेल तर पगाराच्या एक दशांश रक्कम एकदम मिळेल. आणि त्याचा परिणाम खात्रीशीर पेन्शनच्या रकमेवर होणार नाही.
5. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातला 10% हिस्सा पेन्शनसाठी द्यावा लागेल आणि त्याचबरोबर सरकारकडून तो हिस्सा 18.5% एवढा असेल.

वरीलपैकी सर्व योजनांचा साकल्याने विचार करून राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सहभागी व्हायचे की नाही, कोणती योजना फायदेशीर ठरेल ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक विकल्पानुसार ठरवावे आणि त्यासाठी तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top