लेख – पाचवा
सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ
ईमेल – fintechservices21@yahoo.com
सर्वांच्या माहितीसाठी आणि सावधानतेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आयकर कायद्यानुसार अशा प्रत्येक माणसाने, ज्याच्याकडे पॅनकार्ड तसेच आधारकार्ड आहे, त्याने आयकर खात्याच्या वेबसाईटवर जाऊन आपले आधार व पॅन लिंक करून घेणे महत्वाचे आहे.
त्यासाठी सरकारने दि 23.04.2024 रोजी परिपत्रक काढून त्याची मुदत 31.05.2024 पर्यन्त वाढविली आहे. त्यासाठी मात्र रु. १,०००/- एवढी फी आयकर खात्याकडून आकारली जात आहे.
महत्वाची गोष्ट अशी की ३० जून २०२३ पर्यंत पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक न केल्यास अशी सर्व पॅनकार्ड आता आयकर खात्याने निष्क्रीय (inoperative) घोषित केली आहेत.
परिणामी अशा पॅनकार्ड निष्क्रीय झालेल्या व्यक्तींना आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही, बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही, नवीन गुतवणूक करता येणार नाही (जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड वगैरे) इ. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी कार्यरत पॅनकार्ड असणे आवश्यक असते त्या सर्व बाबी करता येणार नाहीत.
तसेच ज्यांचे आधार व पॅन लिंक नाही त्याच्या उत्पन्नातून जी करकपात झाली असेल त्याचा दर हा २०% एवढा असेल. त्यामुळे करकपात करणार्या व्यक्तीला कमी दराने करकपात केली म्हणून आयकर खात्याकडून नोटिसही येत आहेत.
त्यामुळे ज्यांचे आधार व पॅन लिंक नाही अशा सर्व व्यक्तींनी दि. ३१ मे २०२४ पूर्वी हे लिंक करून आपले पॅन कार्यरत (active) करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. बहुधा यामध्ये ज्या व्यक्ती आयकर विवरणपत्र भरत नाहीत अशा व्यक्तींचा समावेश असेल.
आता आपण पॅनकार्ड व आधार लिंक करण्यासाठी काय करावे लागेल ते पाहू.
त्यासाठी तुमच्याकडे पुढील ३ गोष्टी असणे आवश्यक आहे –
१. पॅनकार्ड
२. आधारकार्ड
३. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
त्यासाठी पुढील दोन गोष्टी कराव्या लागतील –
Income Tax (https://eportal.incometax.gov.in) या वेबसाईटवर जाऊन Home पेजवर डाव्या बाजूला link Adhar Status असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपला पॅन व आधार नंबर घालून पहावे. तिथे तुमचे पॅन व आधार लिंक आहे की नाही हे समजेल. लिंक असेल तर पुढच्या पायरीची आवश्यकता नाही.
जर तुमचे पॅन व आधार लिंक नसेल तर पुन्हा home पेजवर डाव्या बाजूला link Adhar असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपला पॅन व आधार नंबर घालून पुढे जावे. त्यानंतर आपली पॅन-आधार लिंकची लेट फीची रक्कम आम्हाला मिळाली नाही असा मेसेज येईल. त्यानंतर पुढे गेल्यावर ई-पे टॅक्सचा पर्याय येईल. तिथे पॅन नंबर आणि मोबाईल नंबर घातल्यावर ओटीपी येईल. त्यापुढे गेल्यावर Income Tax या पर्यायामध्ये Major Head (0021) आणि Minor Head (500) मधे आधार पॅन लिंकिंग चा दंड हा पर्याय निवडून निर्धारणा वर्ष २०२५-२६ साठी रु. १,०००/- ची रक्कम भरून चलन तयार होईल. ते तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, युपिआय इ. कोणत्याही पद्धतीने भरू शकता.
चलन भरून झाल्यावर 10 मिनिटांनी पुन्हा home पेजवर डाव्या बाजूला link Adhar असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपला आधार कार्डप्रमाणे असणारे नाव व मोबाईल नंबर घालून OTP नंबर घालून लिंक करण्यासाठी अर्ज करावा.
वरील सर्व प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी किचकट असल्याने यातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच या गोष्टी कराव्या.