fintechservice

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचे फायदे आहेत पण न दाखल करण्याचे तोटेही ..

लेख – तिसरा

सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ

ईमेल – fintechservices21@yahoo.com

सध्या निवडणुकीची धामधूम जोरात चालू आहे जसा मतदान करणे हा आपला हक्क आहे, तसाच आयकर विवरणपत्र भरणे हाही आपला एक मोलाचा अधिकार आहे. आपण भरलेल्या कराच्या पैशामधूनच सरकार विकासाच्या योजना राबवू शकते.
आपण मागच्या लेखात आयकर विवरण पत्र कोणाला भरणे आवश्यक आहे याविषयी विवेचन केले होते. आता या लेखात आयकर विवरण पत्र भरण्याचे फायदे व तोटे याविषयी माहिती घेऊया.

आयकर विवरण पत्र – फायदे

१. एक जबाबदार नागरिक म्हणून ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयकर विवरणपत्र दाखल करावे.
२. आयकर विवरण पत्र हा उत्पन्नाचा अधिकृत व सरकारी पुरावा आहे. ज्यावरून तुमचे वार्षिक उत्पन्न सिद्ध होते. क्रेडिट कार्डसाठी, कर्ज मिळवण्यासाठी आणि स्वत:ची आर्थिक पत सिद्ध करण्यासाठी याचा उपयोग होतो.
३. व्हिसा मिळवण्यासाठी मागील सलग किमान ३ वर्षांचे विवरणपत्र असणे आवश्यक असते. आर्थिक स्थिती तपासण्यासाठी याचा वापर केला जातो.
४. मोठ्या रक्कमेचा विमा काढण्यासाठी (Term Insurance) विमा कंपन्या मागील ३ वर्षाच्या आयकर विवरणपत्राची  मागणी करतात. त्यावरून येणारा हप्ता दरवर्षी भरण्याची क्षमता तपासली जाते.
५. मोठी सरकारी कामे मिळवण्यासाठी (Tenders ) मागील ५ वर्षाच्या आयकर विवरणपत्राची आवश्यकता असते.
६. आयकर खात्याकडून भरलेल्या किंवा कापलेल्या आयकराचा (TDS / TCS ) परतावा घ्यायचा असेल तर आयकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.
(तुमच्या बँकेतील ठेवींवर, गाडी खरेदीवर, परदेश प्रवासावर, बँकेतून रोखीने रक्कम मोठ्या प्रमाणावर काढल्यास मुळातून कर कपात (TDS / TCS) केली जाते)
७. कर्ज मिळवण्यासाठी आयकर विवरणपत्र लागते. यासाठी मागील कमीतकमी ३ वर्षांच्या विवरणपत्रांची बँका मागणी करतात. त्यावरून बँका तुमची आर्थिक पत व कर्जफेडीची क्षमता तपासतात.
८. व्यवसायातील तोटा किंवा शेअर मार्केटमध्ये व्यवहारात तोटा झाल्यास तो पुढे ओढण्यासाठी ज्या वर्षी तोटा झाला असेल त्या वर्षीचे विवरणपत्र विहित मुदतीत दाखल करणे आवश्यक असते.
९. कोर्टाच्या खटल्यांमध्ये उत्पन्न निश्चित करण्यासाठी आयकर विवरणपत्रांचाच आधार घेतला जातो. उदा. मोटार वाहन कायद्याखाली रस्ते अपघातात नुकसान भरपाई मिळवताना याचा उपयोग होतो.
१०. आयकर विवरणपत्र नियमित व मुदतीत भरल्यामुळे, रिटर्न न भरण्याबद्दल किंवा उशिरा भरल्याबद्दल भरावा लागणारा दंड आणि व्याज वाचते.
११. अधिकृतरित्या संपत्ती/ भांडवल निर्माण करण्यासाठी  आयकर विवरण पत्र नियमित भरणे आवश्यक आहे.

आयकर विवरण पत्र – तोटे

१. व्यवहारात झालेला तोटा पुढील वर्षासाठी carry forward मिळत नाही.
२. विवरण पत्र उशीरा भरल्यास करासोबत व्याज आणि दंडही भरावा लागतो.
३. काही विशिष्ट सवलती आणि वजावटींसाठी अपात्र ठरवले जाते. उदा. सहकारी संस्थांसाठी ८० पी ची सवलत, ८० जी खाली पात्र असणाऱ्या धर्मादाय संस्थांसाठीची सवलत.
४. विवरणपत्र भरण्यास पात्र असूनही न दाखल केल्याबद्दल आयकर खात्याची नोटिस येऊन चौकशी लागू शकते
५. नोटिस आल्यानंतर आयकर खात्याने निश्चित केलेल्या उत्पनाला दडवलेले उत्पन्न गृहीत धरून जास्तीत जास्त दराने कर, त्यावर व्याज व कराच्या ३००% दंड वसूल केला जाऊ शकतो.
६.  आयकर विवरण पत्र उशिरा दाखल केल्याने किंवा अजिबात दाखल न केल्याने काही ठराविक व्यवहारांवर जास्तीचा करभरणा करावा लागू शकतो. उदा. बँकेतून रोख रक्कम काढताना मुळातून करकपात जास्ती दराने होऊ शकते.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून आपले आयकर विवरण पत्र नियमितपणे व विहित मुदतीच्या आधी दाखल करावे व होणारे नुकसान टाळावे.


*Type here..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top