लेख – नववा दि. २३ जून २०२४
सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ
ईमेल – fintechservices21@yahoo.com
आयकर विवरण पत्र भरणे ही प्रत्येकाची नागरी जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडताना काही चुका झाल्या तर भविष्यात तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी याचे विवेचन आजच्या लेखात करूया.
१. फॉर्म ची निवड – आयकर कायद्याप्रमाणे आयटीआर एक ते सात असे वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्ममध्ये विवरण पत्र भरावे लागते. आपल्या उत्पन्नाप्रमाणे योग्य तो फॉर्म निवडणे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. चुकीचा फॉर्म निवडला गेल्यास आपले आयकर विवरणपत्र सदोष आहे असे मानले जाते. आणि पुढील कारवाई होऊ शकते. उदा. आयटीआर १ हा ज्यांचे पगारापासूनचे उत्पन्न ५० लाखापर्यंत आहे आणि एकाच घरापासूनचे उत्पन्न आहे तेच भरू शकतात. आयटीआर २ ज्यांचे उद्योग व्यवसायापासूनचे कोणतेही उत्पन्न नाही अशा व्यक्ती भरू शकतात.
२. रहिवासी स्थिती – ज्या व्यक्ती नेहमी परदेश प्रवास करतात किंवा अधून मधून परदेशांमध्ये राहतात त्या व्यक्तींसाठी भारतीय रहिवासाची स्थिती स्पष्ट करावी लागते. आणि त्यानुसार आयकर विवरणाचा फॉर्म भरावा लागतो. एखादी व्यक्ती भारतामध्ये १८२ दिवस पेक्षा कमी दिवस राहीली असेल तर अशा व्यक्तीची स्थिती परदेशी रहिवासी अशी समजली जाते व त्याप्रमाणे त्याची करपात्रता ठरते.
३. वैयक्तिक माहिती – आयकरच्या वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती बरोबर भरलेली असायला हवी. यामध्ये मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आपला रहिवासाचा पत्ता जर चुकीचा असेल तर आयकर विभागाकडून येणा-या कोणत्याही संवादाची आपल्याला माहिती मिळत नाही. त्यामुळे ही माहिती वेबसाईटवर अद्ययावत भरणे आवश्यक आहे.
४. बँक खात्याचा तपशील – आयकरच्या वेबसाईटवर आपल्या बँक खात्याचा तपशील प्री-व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे. आपल्याला आयकरचा परतावा मिळविण्यासाठी खात्याचा तपशील अद्ययावत असणे आवश्यक आहे.
५. योग्य करप्रणालीची निवड – आपल्या उत्पन्नाप्रमाणे फायदेशीर असलेल्या करप्रणालीची निवड करता येते. जर आपल्याला धंदा किंवा व्यवसायापासूनचे उत्पन्न असेल आणि आपल्याला जुन्या करप्रणाली मध्ये जायचे असेल तर आवश्यक तो फॉर्म १० आयइए भरावा लागतो. तरच तुम्हाला जुन्या करप्रणाली प्रमाणे विवरण पत्र भरता येते.
६. आधीच्या पगाराची माहिती न देणे – एखाद्या व्यक्तीने आपली नोकरी बदलली असेल तर तर आधीच्या पगाराबद्दलची माहिती आयकर विवरणपत्रात देणे आवश्यक आहे. ती न दिल्यास लपवलेले उत्पन्न होऊ शकते.
७. इतर उत्पन्न न दर्शवणे – आयकर पत्रकामध्ये इतर मार्गांनी मिळालेले उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे उदा. बँक बचत खात्यावरील व्याज, मुदत ठेव व्याज, लाभांश इ.
८. करमुक्त उत्पन्न – करदात्याला काही वेळेला करमुक्त उत्पन्न मिळते ते सुद्धा आयकर विवरण पत्रामध्ये दाखवणे आवश्यक आहे. उदा. शेती उत्पन्न, विम्याची रक्कम, प्राॅव्हीडंट फंडचे व्याज
९. लाभांशाची माहिती – आयकर विवरण पत्रामध्ये आपल्याला मिळालेल्या लाभांशाची माहिती प्रत्येक तिमाहीनुसार दाखवणे आवश्यक आहे.
१०. भांडवली नफ्याचे उत्पन्न – आयकर कलम कायदा ५४ नुसार जर भांडवली उत्पन्नाची सवलत घेतली असेल तर त्याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच भांडवली नफ्यासाठी खाते उघडले असेल तर त्याचीही माहिती देणे आवश्यक आहे.
११. बँक खात्यातील मोठे व्यवहार – विवरणपत्र भरताना आपल्या बँक खात्यातील मोठ्या व्यवहारांची तपासणी करून त्यापैकी जे व्यवहार करपात्र असतील ते विवरणपत्रामध्ये दर्शवणे आवश्यक आहे.
१२. फॉर्म २६एएस आणि वार्षिक विवरण पत्र यांचा ताळमेळ – आपले आयकर विवरणपत्र भरताना २६एएस आणि वार्षिक विवरण पत्र यामध्ये दर्शविलेल्या व्यवहारांचा आणि मुळातील कर कपातीचा ताळमेळ आपल्या उत्पन्नाशी करणे आवश्यक आहे. त्या रिपोर्ट मधील सर्व व्यवहार आपल्या विवरणपत्रात समाविष्ट झाले की नाही याची तपासणी करणे अपरिहार्य आहे.
१३. मागील वर्षातील तोटा पुढे ओढून घेणे – आयकर पत्रक भरताना मागच्या वर्षी जो तोटा पुढील वर्षासाठी ठेवला होता तो यावर्षीच्या विवरणपत्रकात ओढला तरच यावर्षीच्या नफ्यामधून तो वजा करता येतो. आणि त्यामुळे करबचत होऊ शकते. यामध्ये घरापासूनच्या उत्पन्नाचा तोटा, व्यवसायाचा तोटा, शेअर बाजारामधील व्यवहारांचा तोटा याचा समावेश होतो.
१४. आयकर विवरणपत्र सत्यापित न करणे – आयकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर आधार ओटीपीने ते सत्यापित करणे आवश्यक आहे. तसे शक्य नसेल तर सही करून त्यामध्ये दिलेल्या पत्त्यावर तीस दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक असते. तसे न केल्यास आपण आयकर विवरणपत्र भरलेच नाही असे मानले जाते.
१५. क्लबिंगच्या तरतुदी विचारात न घेणे – करनियोजना करिता आपण एखादी मालमत्ता/ उत्पन्न घरातील इतर व्यक्तींच्या नावे हस्तांतरित केल्या असतील तर त्यापासूनचे उत्पन्न आपल्या उत्पन्नात समाविष्ट करणे आवश्यक आहे. उदा. मुलांच्या किंवा पत्नीच्या नावे मुदत ठेव ठेवली असल्यास त्यापासूनचे व्याजाचे उत्पन्न आपल्या उत्पन्नात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
१६. विहित मुदतीत विवरणपत्र न भरणे- आयकर विवरणपत्र भरण्यासाठी ज्या विहित मुदती ठरवलेल्या आहेत त्या मुदतीच्या आधी आपले विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. अन्यथा काही तोटे संभवू शकतात. उदा. तोटा पुढील वर्षी ओढता न येणे, दंड, व्याज आणि शिक्षा यासारख्या तरतुदी
१७. आयकर आणि जीएसटीच्या व्यवहाराचा ताळमेळ – जे करदाते जीएसटी कायद्याखाली नोंदणीकृत आहेत अशांनी जीएसटीमध्ये दाखवलेला व्यवहार आणि आयकर कायद्याखाली दाखवलेला व्यवहार यांचा ताळमेळ करणे आवश्यक आहे.
१८. खोट्या वजावटी न घेणे – आयकर कायद्यामध्ये कोणतेही पुरावे सोबत जोडावे लागत नाहीत त्यामुळे खोट्या वजावटी दाखवून आयकर परतावा घेऊ नये. गेल्या वर्षात अशा अनेक खोट्या वजावटींमुळे खूप लोकांना नोटिसांचा सामना करावा लागला आहे. तसेच राजकीय पक्षांना खोट्या देणग्या दिल्या असे दाखवून वजावटी घेतल्या त्यांनाही मोठ्या प्रमाणात नोटीसा आलेल्या आहेत.
१९. आवश्यक ते फॉर्म भरणे – काही वजावटी व सवलती घ्यायच्या असतील तर विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट फॉर्म भरावे लागतात. उदा. पगारातील फरकाची रक्कम मिळाली असेल तर फॉर्म १०ई, जुन्या करप्रणालीत जायचे असेल तर फाॅर्म १०आयईए, अपंगांसाठीच्या सवलतीसाठी फॉर्म १०आयए, परदेशी कराचे सवलत घ्यायची असेल तर फॉर्म ६७ भरावा लागतो. असे फाॅर्म भरले नाही तर सवलत / वजावटी मिळत नाहीत.
२०. म्युच्युअल फंड मधील व्यवहार – एका प्रकारच्या म्युच्युअल फंड मधून दुसऱ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे वळविल्यास त्यामध्ये नफा किंवा तोटा होऊ शकतो. आणि तो करपात्र आहे. हा नफा/तोटा भांडवली उत्पन्नाखाली दाखवणे आवश्यक आहे.
२१. इंट्राडे शेअर व्यवहार – आयकर कायद्यानुसार शेअर बाजारामध्ये एकाच दिवसात ( इंट्राडे ) व्यवहार केल्यास त्याला सट्ट्यापासूनचे उत्पन्न असे मानले जाते. त्यामुळे आयटीआर तीन मध्ये तसे दर्शविणे आवश्यक आहे.
२२. पे लॅटर पर्याय न निवडणे – विवरणपत्र भरताना करदेयता असल्यास “नंतर भरा” असा एक पर्याय उपलब्ध होतो. तो निवडला आणि नंतर कर भरायचा राहिला तर नोटीस येऊन त्यामध्ये व्याज लागू शकते व आर्थिक भूर्दंड बसू शकतो. त्यामुळे असा पर्याय न निवडणे चांगले.
२३. करमुक्त भत्ता – कराचा परतावा मिळवण्यासाठी काही व्यक्ती करपात्र भत्ता असताना करमुक्त भत्ता अशा आशयाखाली दर्शवितात. अशी चुकीची माहिती आयकर विवरण पत्रात देऊ नये कारण अशी चूक आढळून आल्यास दंड व शिक्षा दोन्ही होऊ शकते.
२४. परिशिष्टे न भरणे – विवरणपत्र भरताना काही विशिष्ट प्रकारचे उत्पन्न असल्यास त्यासाठी लागू असलेली परिशिष्टे भरणे आवश्यक आहे. ती न भरल्यास आपले विवरण पत्र सदोष आहे असे मानले जाते. उदा. आभासी चलन व्यवहार, ऑनलाइन गेमिंग इ.
२५. वजावटीची कागदपत्रे – विवरणपत्रात घेतलेल्या सवलती व वजावटी यांची मूळ कागदपत्रे आपल्याकडे जपून ठेवावी.आयकर विभाग मागच्या ८ वर्षांची कागदपत्रे मागू शकतात. विवरणपत्र भरताना कोणतेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नसते परंतु प्रत्यक्ष असलेल्या कागदपत्रांच्या आधारेच आपण सवलती व वजावटी घेणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे सर्व मुद्द्यांचा साकल्याने विचार करून, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच आयकर विवरण पत्र भरावे. आणि भविष्यात होणाऱ्या मनस्तापापासून आपली सुटका करावी.