लेख आठवा – दिनांक – 16 जून, 2024
सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ
ईमेल – fintechservices21@yahoo.com
आर्थिक वर्ष 23 -24 या वर्षासाठी ची आयकर विवरण पत्र भरण्याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे.
आयकर कायद्यामध्ये ITR 1 ते ITR 7 असे एकूण सात प्रकारच्या फॉर्ममध्ये विवरणपत्र भरावे लागते.
आयकर कायद्यानुसार पाच प्रकारचे उत्पन्न
करपात्र आहे. यामध्ये पगारापासूनचे उत्पन्न(salary ), घरापासूनचे उत्पन्न(house property), धंदा किंवा व्यवसाय यापासूनचे उत्पन्न (business/profession), भांडवली उत्पन्न (capital gain)आणि इतर उत्पन्न(other income) याचा समावेश होतो.
तसेच आयकर कायद्यानुसार Person यामध्ये कोण समाविष्ट होते याची पण व्याख्या दिली आहे. यामध्ये वैयक्तिक व्यक्ती (Individual) हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), भागीदारी फर्म (partnership), मर्यादित भागीदारी फर्म (LLP), कंपनी, धर्मादाय/ विश्वस्त संस्था (Trust), राजकीय पक्ष, नगर पालिका इत्यादी. यापैकी कोणाला कुठला फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि त्याची विहित मुदत कोणती हे आपण आजच्या लेखात समजून घेऊया.
१. ITR 1 सहज – ज्यांचे एकूण उत्पन्न 50 लाखापर्यंत आहे अशा सर्व पगारदार व्यक्तींनी या फॉर्ममधे विवरणपत्र दाखल करावे.तसेच ज्यांनी बँक व्याज, एका घरमालमत्तेपासूनचे उत्पन्न, शेती उत्पन्न रू 5000/- पेक्षा कमी अशा प्रकारचे इतर उत्पन्न मिळवले आहे, त्यांनीही हाच फॉर्म वापरावा.
२. ITR 2 – ज्या पगारदार व्यक्तींचे किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाचे एकूण उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी तसेच ज्यांना एकापेक्षा जास्त घरमालमत्तेपासूनचे उत्पन्न , भांडवली नफ्याचे उत्पन्न असेल किंवा ज्यांचे परदेशातील उत्पन्न असेल किंवा ज्यांच्याकडे परकीय मालमत्ता असेल किंवा कंपनीचे भागधारक वा संचालक असतील अशा सर्व व्यक्तींनी या फॉर्ममध्ये विवरणपत्र दाखल करावे.
३. ITR 3 – ज्यांना पगारापासूनचे उत्पन्न मिळत नाही अशा सर्व धंदा आणि व्यवसायापासूनचे उत्पन्न असणा-या सर्वांनी
तसेच एखाद्या फर्ममध्ये भागीदार असतील त्या व्यक्तींनी या फॉर्ममध्ये विवरणपत्र दाखल करावे. तसेच कोणत्याही कारणाने ITR 1, 2, 4 हे फॉर्म भरू शकत नाही त्या व्यक्ती हा फॉर्म भरू शकतात.
४. ITR 4 सुगम – हा फॉर्म निवासी व्यक्ती, भागीदारी फर्म आणि हिंदू अविभक्त कुटुंब ज्यांना धंदा किंवा व्यवसायापासूनचे उत्पन्न आहे त्यांनी वापरावा. गृहीत उत्पन्न योजनेखाली जे धंदा किंवा व्यवसायाचे उत्पन्न दाखवतात त्यांना हा फॉर्म जास्त उपयुक्त आहे.
५. ITR 5 – हा फॉर्म भागीदारी फर्म, मर्यादित भागीदारी फर्म, व्यवसायी ट्रस्ट, AOP, BOI, गुंतवणूक फंड, वगैरेनी विवरणपत्र दाखल करण्यासाठी वापरावा.
६. ITR 6 – Section 11 च्या व्यतिरिक्त स्थापन झालेल्या कंपन्यांनी विवरणपत्रासाठी हा फॉर्म वापरावा.
७ ITR 7 – कंपनीसहित सर्व व्यक्ती ज्यांना कलम 139(4ए), 139(4बी), 139(4सी), 139(4डी) खाली विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे त्यांनी हा फॉर्म वापरणे आवश्यक आहे.
आयकर कायद्याप्रमाणे ज्यांना लेखापरीक्षणाची आवश्यकता असते अशा सर्व व्यक्तींसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 ऑक्टोबर आहे.
बाकी सर्व व्यक्तींची व्यक्तींसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत 31 जुलै आहे.
त्यामुळे योग्य विवरणपत्राचा फॉर्म निवडून विहित मुदतीच्या आधी आपले आयकर विवरणपत्र भरावे व दंड वाचवावा.
एक महत्त्वाची सूचना : कृपया स्वत:ला लागू असणारा फॉर्म ठरविण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.