fintechservice

आयकर रिटर्न भरताना फॉर्म 26AS आणि AIS चे महत्त्व

लेख – चौथा

सीए. जयंती कुळकर्णी
सनदी लेखापाल, कुडाळ

ईमेल – fintechservices21@yahoo.com

आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. तुमच्याकडे आयकर रिटर्न भरण्याचे सर्व पर्याय आणि कागदपत्रे आता उपलब्ध झाले असतील.  AIS आणि 26AS म्हणजे काय आणि ते आयकर रिटर्न भरताना किती महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊया.

फॉर्म 26AS : आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती 26AS मध्ये रेकॉर्ड केली जाते. यामध्ये आता केवळ कर कपातीची माहिती उपलब्ध आहे. बाकी सर्व माहिती तुम्हाला AIS मध्ये मिळते.

26AS फॉर्म कुठे मिळेल? 26AS फॉर्मसाठी तुम्ही प्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा. त्यानंतर ई-फाइल मेनू निवडा. यानंतर, इन्कम टॅक्स रिटर्न निवडा. आता ‘View Form 26AS’ वर क्लिक करा. यानंतर फॉर्म 26AS तुमच्या समोर स्क्रीनवर असेल, तो डाउनलोड करा.

AIS : आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी 2021 पासून आयकर विभागाच्या वेबसाइटवर नवीन अॅन्यूअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट लाँच केले. AIS ही एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे की जे तुम्हाला तुमच्या आर्थिक वर्षात केलेल्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती देते. यातून तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्चाची माहिती मिळते.

AIS मधील माहिती :  AIS मध्ये तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळते. करदात्यांना कर परतावा, स्व-मूल्यांकन कर, कर कपात,आगाऊ कर, म्युच्युअल फंड व्यवहारशेअर व्यवहार, उच्च मूल्याचे व्यवहार, मालमत्ता खरेदी विक्रीचा तपशील, बँकेच्या खात्यात भरलेली आणि काढलेली रोख रक्कम, गाडी खरेदी वरील करकपात, परदेशी व्यवहारांची माहिती, बँकेतील ठेवीवरील व्याज तसेच पोस्टातील ठेवीवरील व्याज, जीएसटी मध्ये खरेदी आणि विक्री केलेल्या मालाचा तपशील यासारखी सर्व माहिती देते.

AIS डाउनलोड कसे करावे : यासाठी प्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा. आता येथे लॉग इन करा. आता होमपेजवरील AIS टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आर्थिक वर्ष निवडा. तुमचे वार्षिक माहिती स्टेटमेंट पाहण्यासाठी आता ‘AIS’ वर क्लिक करा. यानंतर, तुमचे वार्षिक माहिती स्टेटमेंट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

AIS मध्ये माहिती चुकीची असल्यास त्यामध्ये असलेल्या Feedback या मेनू खाली उत्तर देण्यासाठी पर्याय आहे. त्या मार्फत योग्य ते उत्तर देऊन आपला AIS रिपोर्ट दुरुस्त करून घ्यावा.

आपल्याकडील असलेल्या कागदपत्रांशी AIS आणि 26AS यातील माहिती पडताळून पहावी व त्यानंतरच आयकर रिटर्न भरावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top